लग्नात विघ्न ! प्रियांका निकच्या लग्नासाठी सुरक्षा पुरवण्यास जोधपुर पोलिसांचा नकार

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – लवकरच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास जोधपूरमधल्या उमेद भवन या आलिशान महलात लग्नगाठ बांधणार आहेत. ग्लोबल स्टार म्हणून ओळख असलेले प्रियांका आणि निक २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. इतकंच नाही तर या बॉलिवूडमधल्या सर्वात मोठ्या विवाहसोहळ्यासाठी जोधपूर सज्ज झालं असल्याचंही दिसत आहे. लग्न सोहळ्यातील इतर कार्यक्रम सुरू व्हायला अवघा एक दिवस उरला असताना एक विघ्न आल्याचं दिसत आहे. इतकेच नाही तर सदर विघ्नामुळे प्रियांकाला नियोजनात ऐनवेळी काही बदल करावे लागले असल्याचं समजत आहे.

प्रियांका निकच्या विवाहसोहळ्याआधीचे सर्व  विधी आणि कार्यक्रमासाठी मेहरानढाची निवड करण्यात आली होती. परंतु  जोधपुर पोलिसांनी प्रियांका- निक आणि पाहुण्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्यानं प्रियांकानं लग्नसोहळ्यातले कार्यक्रम हे उमेद भवनमध्ये करायचे ठरवले असल्याचं समजत आहे. संगीत, मेहंदी, पूजा हे कार्यक्रम मेहरानढावर होणार होते. प्रियांका निकचा विवाहसोहळा हा उमेद भवनमध्ये होणार आहे.

दरम्यान पुढील आठवड्यात राजस्थानमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे पोलीस व्यग्र आहेत. यामुळेच प्रियांकाच्या लग्नासाठी सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही असं जोधपुर पोलिसांनी जोनास- चोप्रा कुटुंबियांना सांगितलं असल्याचं समजत आहे. परंतु असे असले तरी प्रियांका मात्र  सुरक्षेसाठी जोधपुर पोलिसांवर पूर्णपणे अवलंबून नाही असं दिसत आहे.कारण तिने आधीच सुरक्षा पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीला सुरक्षेची जबाबदारी देऊ केली असल्याचं समजत आहे.

मुख्य म्हणजे  स्थानिक पोलिसांनी मेहरानगढ ते उमेद भवन पॅलेस पर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षा पुरवावी अशी अपेक्षा प्रियांकाला होती. परंतु पोलिसांनी असमर्थता दर्शवल्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून तिनं मेहरानगढावरचे कार्यक्रम रद्द करून ते उमेद भवनमध्ये ठेवले असल्याचं म्हटलं जात आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.