US Election 2020 : महाराष्ट्रानंतर अमेरिकेतही गाजतेय पावसातील सभा ! जो बायडन यांनी दिलं जोरदार भाषण

फ्लोरिडा : वृत्त संस्था – राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील साताऱ्यातील सभा खूप गाजली. शरद पवारांनी भर पावसात भाषण दिलं. त्यावेळी त्यांच्या समोर असलेली गर्दी जागची हल्ली नाही. याच सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा (Udayanraje Bhosale) पराभव केला. इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला या सभेचा फायदा झाला. अशीच एक सभा आता अमेरिकेत झाली आहे. डेमोक्रेटीक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी (United States Presidential election, 2020) रिंगणात असलेल्या जो बायडन (Joe Biden) यांची पावसातील सभा अमेरिकेत गाजत आहे.

3 दिवसांनंतर अमेरिकेत मतमोजणी आहे. त्यामुळं अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन या दोघांनीही या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावल्याचं दिसत आहे. फ्लोरिडामध्ये नुकत्याच या दोन्ही नेत्यांच्या सभा झाल्या. रिपब्लिकन पक्षाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचं आहे. तर ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी बायडन यांनी फ्लोरिडात विशेष जोर लावल्याचं दिसत आहे.

यावेळी बायडन भाषण करत असताना जोरदार वादळी पाऊस झाला. परंतु बायडन यांनी जोरदार भाषण दिलं. बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळं त्यांचे पाठीराखे कारमधून त्यांचं भाषण ऐकत होते. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बायडन यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसल्या. डोनाल्ड ट्रम्प यांना पावसात केस ओले होण्याची भीती वाटते. परंतु बायडन यांना तशी भीती वाटत नाही असे अनेक ट्विट्स सोशलवर दिसले. काहींना तर बायडन यांच्या भाषणानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या (Barack Obama) 12 वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली. बायडन यांनीही त्यांच्या ट्विटरवरून या भाषणातील एक फोटो शेअर केला आहे. हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

You might also like