अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं भारताबाबत पहिलं विधान, घेणार मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतून ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर भारताला मोठा धक्का बसेल असा अंदाज बांधला गेला होता. मात्र, आता जो बायडन भारतासोबतच्या संबंधांना आणखी उंचीवर घेऊन जाण्यासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, अमेरिकेच्या नव्या सरकारने जारी केलेल्या पत्रकामुळे भारतविरोधी असलेल्या चीन आणि पाकिस्तानच्या चिंतेत वाढ होणं आता निश्चित झालं आहे. अमेरिकेने भारताचा उल्लेख महत्वपूर्ण भागीदारी असल्याचा करत उभय देशांमधील संबंध यापुढील काळात आणखी वृद्धींगत होतील, असं म्हटलं आहे.

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती जो बायडन भारत आणि अमेरिकेतील यशस्वी द्विपक्षीय संबंधांचा सन्मान करतात, असं व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी सांगितलं आहे. बायडन यांनी याआधी अनेकदा भारत दौरा केला आहे. ते आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंधांना बळकटी आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असंही व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे. तसंच “एका भारतीय वंशाच्या व्यक्तीनं अमेरिकेचं उपराष्ट्रपती होणं हा देशासाठी नक्कीच ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बळकट होतील,” असं जेन साकी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेतील संबंधं याआधीही चांगले राहिले आहेत ही परंपरा यापुढेही कायम राहील, असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, जो बायडन हे भारताच्या काही निर्णयांच्या विरोधात असल्याचं वृत्त याआधी प्रसारित करण्यात आलं होतं. तर पाकिस्ताननंही बायडन यांच्यासोबतच्या जुन्या संबंधांचा दाखल देत अमेरिकेतील सत्तांतरण पाकसाठी चांगली गोष्ट ठरणार असल्याचा दावा केला होता.

२० भारतीय वंशाच्या व्यक्तींना व्हाइट हाऊसमध्ये स्थान
जो बायडन यांनी आपल्या व्हाइट हाऊसमधील टीममध्ये तब्बल २० भारतीय वंशाच्या व्यक्तींना स्थान दिलं आहे. यातूनच अमेरिकेतील नव्या सरकारचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टीकोन लक्षात येतो. बायडन यांच्या टीममध्ये सहभागी असलेल्या भारतीय वंशाचा नीरा टंडन या अमेरिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहेत. तर माला अडिगा या बायडन यांच्या पत्नीच्या पॉलिसी सल्लागार आहेत. तर सबरीना सिंह या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी अर्थात बायडन यांच्या पत्नीच्या माध्यम सल्लागार आहेत. आयशा शहा यांना सोशल मीडिया आणि मीडिया ब्रिफिंगचं काम देण्यात आलं आहे. भारतीय वंशाच्याच समीरा फाजली या बायडन यांना आर्थिक गोष्टींमध्ये सल्ला देणार आहेत. तर गौतम राघवन हे राष्ट्रपतींसाठीच्या स्टाफची नियुक्त करण्याचं काम पाहणार आहेत. विनय रेड्डी यांच्यावर बायडन यांच्या भाषणाच्या लेखनाची जबाबदारी असणार आहे. यासोबत सोनिया अग्रवाल पर्यावरणाशी संबंधित गोष्टींमध्ये बायडन यांच्या सल्लागार असणार आहेत.