जोफ्रा आर्चरने ‘बनाना स्विंग’ चेंडू टाकून सर्वांना केले हैराण, वायरल होतोय Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखपतीनंतर पुन्हा मैदानात आगमन केले आहे. त्याने काऊंटी क्रिकेटच्या सेकंड इलेव्हन चॅम्पियनशिपच्या सामन्यात आश्चर्यकारक चेंडू टाकला. आर्चरने केळ्याच्या शेपमध्ये चेंडू टाकून सर्वांना हैराण केले.

त्याच्या या चेंडूवर फलंदाज फसला आणि एलबीडब्ल्यू झाला. आर्चरचा हा स्विंग पाहण्यासारखा होता. ससेक्सकडून खेळताना आर्चरने सरे च्या मधल्या फळीतील फलंदाज रिफरला आपल्या बनाना स्विंगने आऊट केले. जोफ्रा आर्चरने हवेत चेंडू स्विंग केला, जो फलंदाज समजू शकला नाही. आर्चरच्या या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या सामन्यात आर्चरच्या बॅटने सुद्धा कमाल दाखवली. त्याने 46 चेंडूत 35 धावा केल्या, ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

बनाना स्विंग म्हणजे काय

बनाना स्विंग रिव्हर्स स्विंगचा एक प्रकार आहे. या स्विंगसाठी सामान्य ते जास्त गतीच्या चेंडूची आवश्यकता असते. यास एक वेगवान यॉर्कर डिलिव्हरी सुद्धा म्हटले जाऊ शकते. बनाना स्विंगमध्ये चेंडू केळ्याच्या शेपमध्ये स्विंग होतो. चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटताच तो हवेत ’सी’ चा शेप घेतो.

अशाप्रकारच्या स्विंग गोलंदाजीची सुरूवात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार यूनुसने केली होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या विरोधात याचा मोठा वापर केला होता. आता अशाप्रकारचा चेंडू टाकण्याची पद्धत अनेक गोलंदाज शिकले आहेत.