अ‍ॅमेझॉनने ऑनलाइन भेटवस्तूंच्या नावाखाली दत्तक मुलांची केली ‘चेष्टा’ !

पोलिसनामा ऑनलाईन – अ‍ॅमेझॉनने दत्तक मूल या संकल्पनेचा वापर करून भावना दुखावणारी वाक्ये लिहिलेल्या भेटवस्तू ‘ यंदा रक्षाबंधनासाठी विक्रीला ठेवल्या होत्या. या वस्तूंबाबत अनेक सामाजिक संस्था आणि पालकांनी आक्षेप घेऊनही अद्याप त्या वस्तू संकेतस्थळावरून उपलब्ध असल्याने अ‍ॅमेझॉनविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोठया भावंडांकडून कुटुंबातील शेंडेफळांची ‘तुला दत्तक घेतले गेले आहे’, असे सांगत थट्टा केली जाते. ही थट्टा घराघरांमध्ये हसण्यावारी घेतली जाते. पण खरोखरीच दत्तक घेतलेल्या मुलांसाठी अशी वाक्ये भावना दुखावणारी ठरतात. त्याचा लाभ उठवित अ‍ॅमेझॉनकडून रक्षाबंधनासाठी भेटवस्तू तयार करताना घडली आहे. अ‍ॅमेझॉनने केलेली ही कृती अतिशय असंवेदनशील असल्याची भावना ‘पूर्णाक’ संस्थेच्या संगीता बनगीनवार यांनी व्यक्त केली. अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळाशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार देत विक्री सुरूच ठेवली. भावा-बहिणीच्या खेळकर नात्याचे प्रतीक म्हणून काही भेटवस्तू अ‍ॅमेझॉनने रक्षाबंधनाच्या काही दिवस आधीपासून विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्यात उशी, कॉफी मग आणि इतर वस्तू असून त्यावर दत्तक मुलांविषयी आक्षेपार्ह वाक्ये लिहिण्यात आली आहेत. ‘तुला कचराकुंडीतून उचलून आणलंय’, ‘तू आई-बाबांचा दत्तक मुलगा आहेस’, अशा वस्तूंवरील वाक्यांमुळे नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मुले दत्तक देणार्‍या संस्थांनी आपला आक्षेप नोंदवूनही अद्याप या वस्तूंची विक्री बंद करण्यात आलेली नाही.