भाजपवर टीका करणाऱ्या पत्रकाराला अटक

इंफाळ : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकार किशोरचंद वांगखेम यांनी मणिपूरमधील भाजप सरकारवर टीका करणारा व्हिडिओ अपलोड केला होता. याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) त्यांना अटक करण्यात आली आहे. १८५७ च्या उठावात इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिन भाजप सरकारने १९ नोव्हेंबर रोजी साजरा केला होता. यासंबंधी पत्रकार किशोरचंद वांगखेम यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत आपले मत मांडले होते. यावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

राणी लक्ष्मीबाई यांचा मणिपूरशी काहीही संबंध नसताना त्यांची जयंती साजरी केल्याने मला दु:ख झाल आहे, असे वांगखेम यांनी या व्हिडिओत म्हटले होते. मुख्यमंत्री वीरेन सिंह केंद्राच्या हातातील आणि हिंदुत्वाचे बाहुले असल्याची टीकाही त्यांनी या व्हिडिओत केली होती.

ही टीका पत्रकार वांगखेम यांच्या अंगाशी आली असून याप्रकरणी २० नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली. तर २६ नोव्हेंबर रोजी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र २७ नोव्हेंबर रोजी वांगखेम यांना रासुकाअन्वये अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. दरम्यान वांगखेम यांच्यावर पूर्वीचेही गुन्हे असून, त्यामुळेच त्यांना रासुकाखाली अटक झाल्याचा दावा भाजपने केला आहे.

भाजपवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनाही विविध सरकारी संस्थांना हाताशी धरून त्रास दिला जात असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा करण्यात आला आहे. तर भाजपविरोधी वृत्तामुळे काही पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्याचे प्रकार मागील काही दिवसांत घडले आहेत. आता तर थेट पत्रकारावर रासुका सारख्या कायद्याखाली कारवाई करण्यात आल्याने आश्चर्च व्यक्त होत आहे.