… तर भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी (दि. 30) एक घोषणा पत्र जारी करत गेल्या 14 दिवसांपासून भारतात राहणाऱ्या, पण अमेरिकन नागरिक नसलेल्या लोकांवर अमेरिकेत प्रवेश करण्यासंदर्भात नवे निर्बंध घातले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियानेही गेल्या 14 दिवसांपासून भारतात असलेल्या आपल्या नागरिकांवर मायदेशी परतण्यासंदर्भात तात्पूरते निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा अथवा मोठा दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेने आपले नागरिक, ग्रीन कार्ड धारक, तसेच 21 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसह, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकारांनाही या प्रवासाच्या निर्बंधांतून सूट दिली आहे. हे प्रवास निर्बंध अनिश्चित काळासाठी लागू केले असून राष्ट्राध्यक्षांच्या पुढील घोषणेनंतरच ते शिथील होणार आहेत. बायडेन म्हणाले, गेल्या 14 दिवसांपासून भारतात राहणारे, जे प्रवासी नाहीत अथवा अमेरिकन नागरिक नाहीत, अशा लोकांच्या प्रवेशास निर्बंध घालणे अथवा त्यांना रोखणे अमेरिकेच्या हिताचे आहे. हा निर्णय आरोग्य तथा मानव सेवा विभागांतर्गत रोग नियंत्रण तथा प्रतिबंध केंद्राच्या सल्ल्याने घेतला आहे. जगातील कोरोना बाधितांचा विचार करता, एक तृतियांशहून अधिक केसेस भारतातून समोर येत असल्याचे ते म्हणाले.

भारतात कोरोनाची स्थिती –

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवा उच्चांक गाठला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात 4 लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 4 लाख 1 हजार 993 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत बरे झालेल्यांची संख्या 2 लाख 99 हजार 988 इतकी आहे.