बाळशास्त्री जांभेकरांचा पत्रकारांनी आदर्श घ्यावा : अमृत पठारे

उरुळी कांचन : पोलीसनामा ऑनलाइन – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर( Balshastri Jambhekar) यांनी मोठ्या हिमतीने मराठी वर्तमानपत्र दर्पण(Darpan) सुरू केले. दर्पणच्या माध्यमातून इंग्रजांविरुध्द स्वातंत्र्यासाठी आंदोलन करण्यासाठी समाजामध्ये जागरूकता केली. त्यांना मराठी पत्रकारितेचा ‘भीष्म पितामह’ ही संबोधले जाते. दर्पण वर्तमानपत्र इंग्रजांना दाखविणारा आरसा होता. आजच्या पीढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असे मत खराडी येथील अमृत बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अमृत पठारे यांनी व्यक्त केले.

नायगाव (ता. हवेली) येथे वडगावशेरी (खराडी) येथील अमृत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मी मराठी प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा पूजा पाटील, अमृत बहुद्देशीय संस्थेच्या सचिव पूजा धुमाळ, सोनल साबळे, मीना बनकर, श्वेता घाडगे उपस्थित होते.

मी मराठी प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा पूजा पाटील म्हणाल्या की, पत्रकार आपल्या प्रखर लेखनाच्या माध्यमातून अहोरात्र समाज जागृतीचे काम करत असतात. कोणत्याही परिस्थितीत सत्य आणि लोकहीताची कास धरून वेळप्रसंगी स्वतःचे सुख दुःख विसरून जनसामान्यांच्या उद्धारासाठी परिवर्तनासाठी आवाज उठवतात, ही बाब समाजासाठी कौतुकास्पद आहे. पत्रकारांचाही सन्मान होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.