नाशिक-मुंबई प्रवास होणार आणखी जलद, वेळेचीही होणार बचत !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – इगतपूरी तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृध्दी महामार्ग ते गोंदेदरम्यानच्या चारपदरी महामार्गाचे रुंदीकरण करून हा रस्ता सहापदरीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने ( नॅशनल अ‍ॅथोरेटी ऑफ इंडिया) मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. हा रस्ता सहापदरीकरण झाल्याने येथील वाहतूककोंडीचा विषय मार्गी लागेल. तसेच नाशिक – मुंबई या प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.

इगतपुरी शिवारात पिंप्रीसदो ते गौंदे औद्योगिक वसाहातीदरम्यान हा महत्वाचा रस्ता आहे. सध्या पिप्रीसदो येथे चारपदरी महामार्ग आहे. मुंबईहून ये- जा करणा-यांची संख्या वाढत असल्याने या मर्गावर कायम वर्दळ असते. त्यामुळे वाहतूककोंडी होते. याची दखल घेत पिंप्रीसदो ते गोंदेदरम्यानच्या महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी खासदार गोडसे प्रयत्नशील होते. अखेर या मार्गाला केंद्राने सहापदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने ( नॅशनल अ‍ॅथोरेटी ऑफ इंडिया)चे मुख्य जनरल मॅनेजर अशिष असाटी यांनी खासदार गोडसे यांना पत्र दिले आहे. पिंप्रीसदो ते गोंदे हा वीस किलोमीटरचा अंतर असून याकामी दोनशे ते अडीचशे कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.