…म्हणून नागपुरी संत्र्यांचा चीन प्रवास थांबला !

पोलिसनामा ऑनलाईन – भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे विदर्भातील नागपुरी संत्री चीनच्या बाजारपेठेत पाठवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. त्याचा फटका संत्री उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

जगभरात विदर्भातील नागपूरची संत्री प्रसिद्ध असून संत्र्याला जागतिक बाजारपेठ मिळावी म्हणून नागपूरचे खासदार व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. फेब्रुवारी महिन्यात नागपूरच्या संत्रीचे एक कंटेनर दुबईला रवाना झाले होते. त्यानंतर चीनमध्ये असलेली मागणी लक्षात घेऊन तेथील बाजारपेठेतही संत्री पाठवण्यासाठी विदर्भातील संत्री उत्पादकांची सहकारी संस्था महाऑरेंजने केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) माध्यमातून प्राथमिक स्तरावर चर्चाही झाली होती. ही प्रक्रिया पुढे जात असतानाच मार्च महिन्यात लॉकडाउनमुळे प्रक्रिया ठप्प झाली. आता चीनसोबत सीमावाद पेटल्याने दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे.

यामुळे या प्रक्रियेला पुन्हा खीळ बसली आहे. या संदर्भात महाऑरेंजचे कार्यकारी संचालक व चीनमध्ये संत्री पाठवण्याच्या प्रक्रियेतील प्रमुख भूमिका बजावणारे श्रीधर ठाकरे म्हणाले, चीनमध्ये पाच ते सहा हजार कोटी रुपयांची संत्र्याची बाजारपेठ आहे. ही बाब ओळखूनच आम्ही चीनमध्ये संत्री पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पूर्व विदर्भातील तांदूळही दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये पाठवला जात होता, पण आता तो जात नाही. तेथे मागणी आहे, पण तांदूळ निर्यातीची प्रक्रिया अवघड असल्याने आता निर्यात केली जात नाही. सरकारने प्रयत्न केल्यास पूर्व विदर्भासह छत्तीसगडमधील तांदूळ चीनमध्ये पाठवता येईल, असे गोंदियातील राइस मिलचे मालक अग्रवाल यांनी सांगितले.