जेएसडब्ल्यू समूहाचे सज्जन जिंदल यांनी दिला मोदींना पाठिंबा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदल यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. विद्यमान सरकारने अर्थव्यवस्थेला आपल्या कार्यकाळात जोरदार चालना दिली आहे. त्यामुळे या सरकारला आणखी पाच वर्षे संधी मिळालीच पाहिजे, असे ट्विट जिंदल यांनी केले आहे.

सज्जन जिंदल यांनी मंगळवारी दोन ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, एक्झिट पोलमुळे सेन्सेक्सला गेल्या १० वर्षांमधील सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली. यातून केंद्रातील विद्यमान नेतृत्वाखालीच अर्थव्यस्थेची विकासाकडे वाटचाल होईल हे स्पष्ट होते”, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान सज्जन जिंदल यांनी या ट्विटमध्ये मोदींचा थेट उल्लेख टाळला असला तरी याद्वारे मोदी सरकारला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.

सज्जन जिंदल यांनी यापूर्वीही एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना मोदींना पाठिंबा दर्शवला होता. सुरुवातीला मोदी सरकार पुन्हा सहज सत्तेत येईल असा अंदाज होता. मात्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमधील निकाल पाहता मोदी सरकारसाठी कठीण परिस्थिती असल्याचे दिसते. पण मोदी सरकारला दुसऱ्यांदा संधी मिळालीच पाहिजे. सरकारला पहिल्या टर्ममध्ये जे काम करता आले नाही ते काम दुसऱ्या टर्ममध्ये पूर्ण करता येईल”, असे जिंदल यांनी म्हटले आहे.

You might also like