पोलिस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, पत्रकारांशी विविध विषयांवर अनौपचारिक बातचीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहराचे पोलिस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आज (शनिवार, दि. 19 डिसेंबर 2020) पोलीसनामा ऑनलाइनच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर अनौपचारिक बातचीत केली. यावेळी डॉ. शिसवे यांनी काही जुन्या आठवणी सांगुन अनेक गोष्टींंना उजाळा दिला. पुणे शहरात कोरोना काळात नेमक्या कशा पध्दतीनं शहर पोलिसांनी परिस्थितीशी सामना केला याबाबत देखील त्यांनी थोडक्यात सांगितले. सिंधुदुर्ग, गोंदिया, मुंबई येथे कार्यरत असतानाचे काही अनुभव देखील त्यांनी सांगितले.

 

 

भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) दाखल झाल्यापासूनच्या काही महत्वाच्या आठवणी डॉ. शिसवे यांनी सांगितल्या. विशेष करून नक्षलग्रस्त जिल्हयात तसेच सिंधुदुर्ग येथे पोलिस अधीक्षक म्हणून तर मुंबई झोन-1 येथे कार्यरत असतानाचे काही अनुभव त्यांनी शेअर केले. कामाचा प्रचंड व्याप असताना देखील लेखन, वाचन, साहित्य, अध्यात्म या बाबींकडे डॉ. शिसवे यांचा कल असल्याचे त्यांच्याशी बातचित करताना प्रखरतेने जाणवले. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांचे अनुभव सांगताना हिंदी शायरीचा देखील वापर केला. डॉ. शिसवे यांचे विविध विषयांवरील अनेक लेख यापुर्वी वेळावेळी नामांकित नियतकालिकांमधून प्रसिध्द झाले आहेत. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी त्यांची भाषणे देखील जशीच्या तशी छापण्यात आली आहेत.

कोरोना काळातील गणेशोत्सव तसेच कोरोना काळात पोलिसांसमोरील आव्हानांना कोणत्या परिस्थितीत शहर पोलिस सामोरे गेले याबाबतच्या देखील काही आठवणी डॉ. शिसवे यांनी सांगितल्या. यावेळी ते म्हणाले, एक पोलिस अधिकारी आणि टीम लिडर म्हणून काम करताना वेळप्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागते. महाविद्यालयीन काळापासून वाचन आणि लेखनाची आवड असल्याचं ते म्हणाले.

कामाच्या व्यापामुळे सध्या लिहीण्यास वेळ मिळत नसला तरी प्रवासादरम्यान वेळ मिळाल्यास आपण निश्चितच वाचनास प्रधान्य देतो असंही ते म्हणाले. बराच वेळ अनौपचारिक बातचित झाल्यानंतर त्यांनी पोलीसनामा ऑनलाइनच्या टीमसोबत देखील विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. सर्वात शेवटी त्यांनी पोलीसनामा ऑनलाइनच्या वाटचालीचं कौतुक करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.