सरकार पाडण्यासाठी चक्क न्यायाधीशांचा हस्तक्षेप, मुख्यमंत्री जगनमोहन यांचं सरन्यायाधीशांना पत्र

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत रेड्डी यांनी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांना पत्र लिहले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. व्ही. रमन्ना हे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत मिळून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा, आरोप त्यांनी लिहलेल्या पत्रात केला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे प्रमुख सल्लागार अजेय कल्लम यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले, जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बोबडेंना ८ पानी पत्र लिहले आहे. त्यात राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, त्याकरता न्यायाधीश रमन्ना हे चंद्राबाबू नायडू यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. उच्च न्यायालयातील कामकाजात ते हस्तक्षेप करत असून, न्यायाधीशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं रेड्डी यांनी सरन्यायाधिशांना लिहलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

तद्वतच, थेट सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या जेष्ठ न्यायाधीशावर अशाप्रकारे पक्षपातीपणाचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून केल्या जाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचं सांगितलं होते. तेव्हा सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता, पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवर सवाल उपस्थित होत आहे.