जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये रूग्णांना परस्पर आणू नये, त्रुटी दूर करण्यासाठी रूग्णालय प्रशासनाला आदेश : रूबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सीओईपी मैदानावर उभारण्यात आलेल्या जंबो कोव्हीड हॉस्पीटलमध्ये रुग्ण नाकारू नयेत. याठिकाणी काही कमतरता असतील, तर तातडीने पुर्ण कराव्यात, असे आदेश व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी रुग्णांना परस्पर जंबो कोविड रुग्णालयामध्ये दाखल करू नये. महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर प्रवेश प्रक्रिया अधिक सुरळीत होईल, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

राज्य शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून सीओईपीच्या मैदानावर जंबो कोव्हीड हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. ६०० ऑक्सीजन आणि २०० व्हेंटीलेटर्स बेडस्च्या या हॉस्पीटलमध्ये बुधवारपासून रुग्ण दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, याठिकाणी रुग्ण दाखल करण्यासाठी कोणाकडे चौकशी करायची, रुग्णांकडे लक्ष दिले जात नाही येथपासून जेवण व अन्य सुविधांबाबत तक्रारी येण्यास सुरूवात झाली. अशातच काल दोन गंभीर रुग्णही दगावल्याने जंबो कोव्हीड हॉस्पीटलचे व्यवस्थापन टीकेच्या स्थानी आले आहे. दरम्यान, शिवसेनेनेही जम्बो कोव्हिड रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्याच्या अटी शर्ती मध्ये शिथिल आणावी अशी मागणीचे शिवसेनेने पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे. शिवाजीनगर येथील जंबो रूग्णालयात ऑक्सिजन सॅच्युरेशन फक्त ७४% असलेल्या रुग्णाला तसेच कोव्हिड तपासणी केलेली नसलेल्या रुग्णाला ऍडमिशन नाकारण्यात आल्याच्या घटना घडल्याचे विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोव्हीड रुग्णालयाचे व्यवस्थापन ज्यांच्याकडे दिली आहे त्या कंपनीचे अधिकारी, महापालिकेचे आरोग्य व अन्य विभागातील अधिकार्‍यांची आज बैठक घेतली. या बैठकीनंतर माहिती देताना अग्रवाल म्हणाल्या, की रुग्णालयातील सर्व कामे युद्धस्तरावर पुर्ण करण्याचे आदेश संबधित कंपनीच्या प्रतिनिधींना दिले आहेत. आजमितीला रुग्णालयात २०० रुग्ण दाखल आहेत. ससून रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटच्या मेन्टेनन्सच्या कामामुळे काही रुग्णांना याठिकाणी आणण्यास सुरूवात केली आहे.

विशेषत: मागील काही दिवसांत ऑक्सीजन अथवा व्हेंटीलेटर्सची सुविधा नसल्याने काही रुग्णांना रुग्णालयात वेळेत दाखल करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर या रुग्णालयामध्ये ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर्सची सुविधा असल्याने याची गरज असलेल्या पॉझीटीव्ह कोव्हीड रुग्णांनाच याठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे याठिकाणी कुठल्याही रुग्णाला थेट प्रवेश मिळणार नाही. येथे प्रवेश मिळविण्यासाठी महापालिकेच्या ०२०- २५५०२११० अथवा ०२० -२५५०२११५ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

चौकट

जंबो कोव्हीड रुग्णालयामध्ये गंभीर कोव्हीड रुग्णांवर इलाज करण्यात येत आहे. शुक्रवारी अन्य रुग्णालयातून येथे दाखल झालेल्या दोन गंभीर रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील अन्य रुग्णालयांप्रमाणेच याठिकाणी गंभीर रुग्णांचे जीव वाचावेत यासाठी जंबो कोव्हीड रुग्णालयात यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे.