वाहतुकीच्या समस्येमुळे पुण्यातील जुना बाजार बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दशकापासून दर रविवारी आणि बुधवारी भरणारा जुना बाजार आता बंद होणार आहे. शहरातील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जिकीरीची होत चालल्याने शहर पोलिसांनी रस्त्यावर सुरु असलेला हा जुनाबाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस पर्यंत वाहतूक सुरळीत राहण्याकरीता प्रायोगिक तत्वावर पुढील ३० दिवसांकरीता या रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्यात येत असून रविवारी व बुधवारी भरणाऱ्या जुना बाजारातील दुकाने रस्त्यावर लावण्यास निर्बंध करण्यात येत असल्याचा आदेश पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मंगळवारी रात्री काढला आहे.

गेल्या अनेक दशकापासून या ठिकाणी जुना बाजार भरविण्यात येतो. या ठिकाणी अनेक दुर्मिळ जुन्या वस्तू पूर्वी मिळत असे. आजही काही विक्रेते याठिकाणी जुन्या वस्तू विकताना दिसतात. मात्र, गेल्या काही वर्षापासून याबाजारात नवीन वस्तू प्रामुख्याने विकल्या जातात. छोटे छोटे व्यावसायिक आपल्या घरी छोट्या टपरीमध्ये आठवड्यातील पाच दिवस वेगवेगळ्या वस्तू तयार करुन त्या बुधवारी व रविवारी येथे विक्रीला घेऊन येतात. अन्य कोणत्याही बाजारापेक्षा येथे कमी किंमतीत त्यामानाने चांगल्या वस्तू मिळत असल्याने अनेक गरीब लोक येथे खरेदीसाठी येत असतात. वाढत्या वाहतूकीमुळे हा बाजार हलवावा, अशा सूचना गेल्या काही वर्षांपासून सुरु होत्या. त्यामुळे या रस्त्याच्या खालच्या बाजूला दुकाने हलविण्यात आली आहेत. असे असले तरी केवळ दोन दिवस येथे विक्रीसाठी येणारे रस्त्यावर बसूनच आपला माल विकत होते. सकाळी ८ वाजता सुरु होणारा हा बाजार सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत चालू राहत असे.

रस्त्यावरील शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस पर्यंतच्या वाहतूक नियमनाकरीता अधिसूचना काढण्याकरीता पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी अहवाल सादर केला. त्यानुसार पोलीस सह आयुक्त डॉ. शिसवे यांना आदेश काढला आहे. त्यानुसार शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस या रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग झोन तसेच रविवारी व बुधवारी भरणाऱ्या जुना बाजारातील दुकाने रस्त्यावर लावण्यास निर्बंध करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त