स्क्रॅपिंग पॉलिसी ! जुन्या कारला काढा भंगारात; नवी खरेदी केल्यावर मिळेल 5 % सूट

नवी दिल्ली : जर तुमची कार जुनी झाली आहे आणि नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. स्क्रॅपिंग पॉलिसीच्या अंतर्गत जर तुम्ही जुने वाहन स्क्रॅप (भंगार) केल्यानंतर कोणतेही नवीन वाहन खरेदी केले, तर तुम्हाला 5 टक्केची सूट दिली जाईल. याबाबतची घोषणा स्वत: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

गडकरी यांनी न्यूज एजन्सी पीटीआयशी चर्चा करताना म्हटले की, जुन्या वाहनांना भंगार करण्याच्या बदल्यात वाहन कंपन्या ग्राहकांना नव्या वाहनाच्या खरेदीवर सुमारे पाच टक्के सूट देतात. स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा 2021-22 च्या केंद्रीय बजेटमध्ये करण्यात आली आहे. या पॉलिसीमध्ये 4 फेज असतील, ज्यापैकी एका फेजमध्ये सूटबाबत उल्लेख आहे.

जुन्या वाहनांची फिटनेस टेस्ट
पॉलिसीच्या अंतर्गत जुन्या वाहनांना फिटनेस टेस्टमधूनसुद्धा जावे लागेल. यानुसार पर्सनल व्हेईकल्सला 20 वर्षांनंतर आणि कमर्शियल व्हेईकल्सला 15 वर्षांनंतर फिटनेस टेस्ट करावी लागेल. गडकरी यांनी म्हटले, या पॉलिसीचे चार प्रमुख फेज आहेत. सूट शिवाय, प्रदूषण पसरवणार्‍या वाहनांवर ग्रीन टॅक्स आणि इतर शुल्काची तरतूद आहे. त्यांना अनिवार्य फिटनेस आणि प्रदूषण टेस्टमधून जावे लागेल. यासाठी देशात ऑटोमेटेड फिटनेस सेंटरची आवश्यकता असेल आणि आम्ही त्या दृष्टीने काम करत आहोत.

फिटनेस टेस्टचा किती खर्च
रिपोर्टनुसार, फिटनेस टेस्टसाठी सुमारे 40,000 रुपयांपर्यंतचा खर्च येईल, जो रोड टॅक्स आणि ग्रीन टॅक्सशिवाय असेल. हे फिटनेस सर्टिफिकेट केवळ 5 वर्षांसाठी मान्य असेल. तुमचे जुने वाहन फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच त्यास रस्त्यावर धावण्यास परवानगी असेल. जर वाहन टेस्टमध्ये फेल झाले तर त्यास रजिस्टर केले जाणार नाही आणि ते स्क्रॅप (भंगार)मध्ये पाठवण्याशिवाय इतर पर्याय नसेल.