सोमवारी गुरु-शनी युतीचा दुर्मीळ सोहळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या सोमवारी (दि. 21) संध्याकाळच्या आकाशात गुरु आणि शनी या ग्रहांची युती पाहण्याचा योग मिळणार आहे. हे दोन्ही ग्रह तेव्हा एकमेकांपासून फक्त 0.1 अंशांवर आलेले दिसणार आहेत. सूर्यास्तानंतर संध्याकाळी साडेसातपर्यंत ही घटना पाहता येईल. या नंतर हे दोन ग्रह इतक्या जवळ थेट 2080 मध्ये येणार आहेत. यापूर्वी 1226, 1623 मध्ये एवढ्या जवळ आले होते. आता पुन्हा एकदा हा योग आला आहे. ही घटना पाहताना दुर्बिण असल्यास या दोन्ही ग्रहांची जोडी दिसेल. अन्यथा साध्या डोळ्यांनी हे दोन ग्रह एकच आहेत, असे दिसू शकेल.

गुरु व शनी आकाराने सुर्यमालेतील पहिल्या, दुस-या क्रमाकांचे ग्रह आहेत. या ग्रहांमधील अंतर पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासापेक्षा पाच पटीने कमी होईल. ते साध्या डोळ्यांनी पाहता येईल. हे दोन्ही ग्रह वेगळे असल्याचे जाणवणार नाही. 31 मे 2000 रोजी गुरु व शनी यांची युती झाली होती. मात्र 0.1 अंश एवढया कमी अंतरावर 1623 साली आले होते. त्यापूर्वी 1226 मध्ये जवळ आले होते. आता आठ शतकांनी पुन्हा एकदा हा योग आला आहे. त्यानंतर 15 मार्च 2080 रोजी असा योग येईल.

… तर युती पाहता येणार नाही
याबाबत मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राने सांगितले की, गुरु आणि शनीची युती होणार आहे. सोमवारी ही युती पाहता येईल. मात्र सोमवारी काय हवामान असेल यावर हे अवलंबून आहे. कारण सोमवारी सांयकाळी ढगाळ हवामान असेल तर मात्र ही युती पाहता येणार नाही. या दिवशीच्या हवामानाचा अंदाज घेऊनच केंद्राचा कार्यक्रम आखला जाईल.