महाराष्ट्रात दुर्मिळ ब्लॅक पँथरचे ‘दर्शन’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ब्लॅक पँथरचे काही थक्क करणारे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. पुण्याच्या वाइल्ड लाइफ फोटोग्राफर असणार्‍या अभिषेक पगनीस यांनी फोटो कैद केले आहेत. अवघ्या 20 फूटावरुन त्याने ब्लॅक पँथरला कॅमेर्‍यात कैद केले आहे. 23 वर्षीय अभिषेक पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असून फोटोग्राफी त्याची आवड आहे.

दुर्मिळ ब्लॅक पँथरचे फोटो काढायला मिळल्यामुळे पगनीस स्वत:ला खूप नशीबवान समजत आहे. अभिषेक म्हणतो की, ‘ही माझी पहिलीच वाइल्ड लाइफ ट्रीप होती. ब्लॅक पँथर स्पॉट झालेल्या ठिकाणी आम्ही तब्बल अडीच तास वाट पाहिली. ब्लॅक पँथरचे दर्शन होईल अशी आशा होती. अखेर ब्लॅक पँथर दिसला. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. मी स्वत:ला नशीबवान समजतो कारण दुर्मिळ अशा ब्लॅक पँथरचं दर्शन झाले. अभिषेक पगनीस जून 2019 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती.

त्याने आता ब्लॅक पँथरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चर्चेचा विषय ठरत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा व्याघ्र दर्शनासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी या प्रकल्पात बघायला मिळते. वाघ व बिबटया सोबत आता ताडोबात ब्लॅक पँथर हा कुतूहलाचा व संशोधनाचा विषय झालेला आहे.