Coronavirus : ‘लॉकडाऊन’नंतर केवळ ‘या’ प्रवाशांना रेल्वेनं ‘प्रवास’ करण्याची ‘परवानगी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये देशातील सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. देशातील लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपत असून 15 एप्रिल पासून रेल्वे सेवा पुन्हा सुरु होणार असल्याचे वृत्त मध्यंतरी येत होते. मात्र सरकारने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही, परंतु भारतीय रेल्वेने 14 एप्रिल नंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याच्या तयारीवर विचार करण्यात येत आहे.

21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर, प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी विविध प्रकारची तयारी करणे आवश्यक आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या थांबलेला नाही. रेल्वेला आपली सेवा सुरु करण्याचे आदेश मिळाल्यानंतर रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षेसंबंधी योग्य ती उपाय योजना करावी लागेल. यासाठी रेल्वेच्या सर्व झोनचे विरिष्ठ अधिकारी 14 एप्रिलनंतर त्यांच्या समोर येणाऱ्या आव्हानांचा विचार करत आहेत. तसेच यासाठी त्यांच्याकडे अनेक प्रस्ताव आहेत, यामध्ये संपूर्ण निरोगी असलेल्या व्यक्तीलाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

पुढील आठवड्यात रेल्वे सुरु करण्याचा निर्णय होऊ शकतो.
14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपण्यासाठी थोडाच अवधी शिल्लक राहिल्याने रेल्वेकडून अनेक बाबिंनवर विचार सुरु आहे. सामाजिक अंतराबरोबरच प्रवाशांना कोरोना विषाणूबद्दल सतत सतर्क व जागरुक ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे विचार करत आहे. यामध्ये प्रवाशांचे आरोग्य तपासण्यापासून प्रवाशांना मास्क लावून प्रवास करण्याचा सल्ला देण्यापर्यंतच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी रेल्वे अधिकाऱ्यांना असा विश्वास आहे की, सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर रेल्वे सेवा एकाच वेळी सुरु न करता ती वेगवेगळ्या टप्प्यात सुरु केली जाऊ शकते. रेल्वे अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितले की, रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो.

प्रथम कोणत्या मार्गावर रेल्वे सुरु होईल ?
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा अत्यंत संवेदनशील काळ आहे आम्ही यावेळी महसूलाचा विचार करत नाही. आमचे ध्येय प्रवाशांच्या सुरक्षेवर असून रोगाचा प्रसार होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. सरकार ग्रीन सिग्नल नंतर सर्व रेल्वे सेवा सुरु होईल. परंतु अद्यात कोणताही निर्णय आम्ही घेतला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी अनेक पर्यायावर चर्चा झाली आहे. मात्र, प्रत्येक रेल्वे गाडी रेल्वे बोर्डाच्या विशेष मंजुरीनंतरच चालवली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्या मार्गावर रेल्वेची अधिक आवश्यकता आहे याला प्राधान्य दिले पाहिजे. उदा. ज्या ठिकाणी स्थलांतरित मजुर अडकून पडले आहेत आणि ज्या ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही अशा मार्गांवर रेल्वे सुरु होईल.

केवळ निरोगी लोकांना प्रवासाची परवानगी
रेल्वे त्या प्रोटोकॉवरही विचार करत आहे, जिथे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ थर्मल स्क्रीनिंगनंतरच प्रवाशांना रेल्वेमध्ये चढण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. असे अनेक प्रस्ताव रेल्वे अधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर आम्ही आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार प्रवाशांना मास्क घालण्यास सांगण्याचा विचार करत आहे. आम्ही रुग्णांच्या चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य अॅप वापरण्याचा आणि फक्त निरोगी प्रवाशांनाच रेल्वेमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्याचा विचार करत आहोत. रेल्वेने सद्यस्थितीत यार्डमध्ये उभे असलेल्या कोचची सुरक्षा, स्वच्छता आणि सर्व प्रकारची दुरुस्ती करण्याचे सर्व झोनला सांगितले आहे. कारण 21 दिवस रेल्वे बंद असल्याने अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.