फक्त ऑनलाईन माहिती भरली ! पुणे स्मार्ट सिटीचे मानांकन थेट 28 व्या स्थानावरून 15 व्या क्रमांकावर, ‘गोंधळी’ कारभार चव्हाट्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे स्मार्ट सिटीने दोन वर्षात केलेल्या आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीची अद्ययावत माहिती केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये ऑनलाईन अपडेट केली नव्हती. तसेच केंद्र शासनाकडील प्रणाली सांभाळणार्‍या आणि दर आठवड्याला रँकींग अपडेट करणार्‍या दिल्लीतील संबधित अधिकार्‍यांनाही ‘पुणे स्मार्ट सिटी’ तील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी साधा संपर्कही साधला नाही. मात्र, ‘पुणे स्मार्ट सिटी’चे रँकींग १७ वरून २८ व्या क्रमांकापर्यंत घसरण झाल्याचे वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर जागे झालेल्या पुणे स्मार्ट सिटीने केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये सद्यस्थितीची माहिती अपडेट केल्यानंतर अवघ्या काही तासात पुणे स्मार्ट सिटी थेट १५ स्थानावर पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये देशभरातून पुणे महापालिकेची दुसर्‍या क्रमांकाने निवड झाली. परंतू कालांतराने स्मार्ट सिटी प्रकल्प भरकटल्याचे लक्षात आल्यानंतर त्याकडे जवळपास दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, नुकतेच दोन दिवसांपुर्वी पुणे स्मार्ट सिटीचे मानांकन २८ पर्यंत घसरल्याचे समोर आले. यावरून स्मार्ट सिटी प्रशासनावर जोरदार टीका सुरू झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे प्रत्येक आठवड्याला मानांकन होते. पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र, केवळ केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती अपडेट न केल्याने मानांकन घसरल्याचा दावा स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी केला होता. त्यानुसार मागील दोन दिवसांत सद्यस्थितीची माहिती अपडेट केल्यानंतर महापालिकेला देशात १५ वे मानांकन मिळाले असून राज्यात पुणे महापालिका ठरली आहे. तसेच ३० सप्टेंबरला वार्षिक मानांकन ठरते, असेही त्यांनी नमूद केले होते.

मात्र, आज प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये पुणे लॉकडाउनपूर्वी सतराव्या क्रमांकावर होते, असेही म्हंटले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रकल्पांसाठी अनेक पुरस्कार मिळवणार्‍या पुणे स्मार्ट सिटीच्या कारभारातील गोंधळ यानिमित्तानेे समोर आला आहे. लॉकडाऊनपूर्वी सुरू केलेली कामेदेखील निरंतर सुरू आहेत. त्याशिवाय करोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीने एचआयएमएस प्रकल्पाअंतर्गत नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. तसेच, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर रूमद्वारे पुणे स्मार्ट सिटी सर्वतोपरी योगदान देत आहे. यामुळे स्मार्ट सिटीची कामगिरी निश्चितच उंचावली आहे .
– रुबल अग्रवाल , अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ

नियोजित प्रकल्प राबविण्याबरोबरच पुणे स्मार्ट सिटीने लॉकडाऊनच्या कालावधीतही करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पुढाकार घेतला आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वॉर रूम म्हणून अत्यंत प्रभावीपणे उपयोग केला आहे. तसेच प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटी मिशनमधील पुणे शहराचे स्थान आणखी उंचावेल असा विश्वास आहे.
– महापौर मुरलीधर मोहोळ

महाराष्ट्रातील शहरांचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन
पुणे- १५, नाशिक- १६, नागपूर- ४२, सोलापूर- ४४, ठाणे- ५५, पिंपरी चिंचवड- ६१, कल्याण डोंबिवली- ६२, औरंगाबाद- ६७