‘खोदा पहाड निकला चुहा’ ! गुडविन ज्वेलर्सच्या ‘शो-रुम’ तपासणीत मिळाले फक्त दीड लाखांचे दागिने

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सोन्याची भिशी लावून करोडो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या गुडविन च्या चार दुकानांना पोलिसांनी सील ठोकले होते. या चार पैकी तीन दुकानांची कुलूपे तोडून पोलिसांनी तब्बल ७ तास तपासणी केली. तेव्हा या तीनही दुकानातून केवळ गोल्ड प्लेटेड दागिने हाती लागले असून त्यांची अंदाजे जास्तीतजास्त किंमत दीड लाखांपर्यंत आहे.

त्यामुळे पोलिसांची ही कारवाई ‘खोदा पहाड, निकला चुहा’ अशी झाली आहे. आता डोंबिवली येथील दुकानाची तपासणी बाकी आहे. या तीन दुकानांच्या तपासणीनंतर आता त्यातही फारसे काही हाती लागण्याची शक्यता पोलिसांना वाटत नाही. या दुकानात मोठ्या प्रमाणावर दागिने असण्याची शक्यता पोलिसांना वाटत होती.

गुडविन ज्वेलर्सचे संचालक सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांनी नागरिकांकडून भिशी, ठेवी आणि दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपये गोळा करून पलायन केले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर गेले दोन दिवस ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरांतील दुकानांचे कुलूप तोडून तेथे पंच आणि साक्षीदारांच्या समक्ष दुकानांची तपासणी केली. या दुकानात फारसे काही हाती लागले नाही. आता दुकानातील सीसीटीव्हीवरुन दुकानातील दागिने कधी काढून नेण्यात आले, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

डोंबिवलीतील दोन दुकानांपैकी एक दुकान हे गुडविन ज्वेलर्सच्या मालकीचे आहे. अन्य तीन दुकाने ही भाड्याच्या जागेत आहेत. या दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली जाणार आहे. शनिवारपर्यंत शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रातील नागरिकांची अंदाजे नऊ कोटींच्या आसपास फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Visit : Policenama.com