5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत केवळ चर्चा, अद्याप कोणताही निर्णय नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ९ वी ते १२ वी च्या ७० टक्के शाळा सुरु झाल्या आहेत. तर येणाऱ्या वर्षात (२०२१) पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी सरकारी स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. परंतु, यावरती अंतिम असा निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे.

SCERT च्या माहितीनुसार, आताच्या घडीला राज्यात नववी ते बारावीचे एक लाखाहून अधिक विद्यार्थी वर्गात हजेरी लावत आहेत. मात्र, पाचवी ते आठवीचे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा लहान आहेत. तसेच शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या, शाळांची स्वच्छता, वर्गांचे नियोजन करावे लागणार असल्याने अजूनही यावर निर्णय होत नसल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी म्हटले.

पुढे त्यांनी सांगितलं की, नववी ते बारावीच्या वर्गाची उपस्थिती ४ तासांची आणि ५० टक्के एवढीच आहे. त्याचरितीने पहिली ते आठवीच्या वर्गाचे नियोजन करावे लागणार आहे. शाळा सुरु झाल्यावर उपस्थिती कमीत कमी ठेवावी लागणार असून सामाजिक अंतर, मुखपट्टी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. यासंदर्भात सरकारी स्तरावर आढावा घेतला जात आहे.

संमतीपत्रावरून गोंधळ
पालकांना शिक्षणाधिकारी यांच्याकडून संमतीपत्राचा नमुना पाठवला जात असल्याने विद्यार्थी, पालकांत गोंधळ निर्माण झाला आहे. सही करायची कशी, मुलांच्या सुरक्षेचं काय, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहे.