न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांचीसुद्धा सीबीआय खटल्यातून माघार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांच्या विरोधातील खटल्यातून न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांनी माघार घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही यापूर्वी या प्रकरणातून माघार घेतली होती. त्यांच्या पाठोपाठ आता ए. के. सिकरी यांनीही माघार घेतली आहे. त्यांच्या या माघार घेण्याने अंतरिम संचालक नागेश्वर राव यांच्याविरोधातील याचिकेवर आता उद्या (ता.२४ ) नव्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.

न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांनी वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांच्याशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “मी माघार घेतल्याने या प्रकरणात सुनावणी करू शकत नाही, त्यामुळे माझी भूमिका समजून घ्या.”  १० जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी केली होती. या समितीमध्ये सिकरी यांचाही समावेश होता. या बैठकीतून पुन्हा नागेश्वर राव यांना अंतरिम संचालक करण्यात आले होते. दवे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत.

सिकरी यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर दवे यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “आपल्या सरन्यायाधीशांनी सुद्धा या प्रकरणात सुनावणी करण्यापासून माघार घेतली होती. हे क्लेषदायक आहे. आता तुम्ही सुद्धा (न्या. सिकरी) माघार घेत आहे.

“दवे यांचे हे वक्तव्य ऐकून सिकरी म्हणाले की, “सरन्यायाधीशांनी या प्रकरणातून माघार घेतली आहे, यावर मी काहीही बोलू शकत नाही.