पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्ती 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च  न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून नेमणूक झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. न्या. घोष यांची नेमणूक झाल्यामुळे देशाला लोकपाल कायदा पास झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकपाल मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी लोकपाल कायदा पास करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी  यांचा समावेश असलेल्या निवड समितीकडून पहिल्या लोकपालाची निवड करण्यात आली आहे. राजशिष्टाचार पूर्ण करून रामनाथ कोविंद यांच्या वतीने न्या. घोष यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

न्या. पिनाकी चंद्र घोष हे सध्या मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयातून सन २०१७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांची मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. न्या घोष सध्या ६६ वर्षाचे असल्याने वयाची ७० वर्ष पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात.