मौजमजेसाठी महागड्या सायकली चोरणारा शाळकरी मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मौजमजेसाठी महागड्या सायकल चोरी करणाऱ्या एका शाळकरी मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीच्या १० सायकली जप्त केल्या आहेत.

येरवडा भागातील गुंजन चित्रपटगृहाजवळ एक मुलगा चोरलेली सायकल घेऊन थांबला असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. ताब्यात घेतलेला मुलगा इयत्ता आठवीत शिकतो. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सायकल चोरीला सुरुवात केली होती.

सुरुवातीला एक सायकल चोरून त्याने ती शाळेतील एका मित्राला दोनशे रुपयांत विकली. त्यानंतर एकापाठोपाठ येरवडा, नवी खडकी परिसरातून सायकली चोरण्यास सुरुवात केली. या भागातील सोसायट्यांमध्ये लावलेल्या सायकली चोरण्यास सुरुवात केली. त्याच्याकडून १ लाख रुपये किंमतीच्या १० सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.