Coronavirus : जुव्हेंटसचा स्टार फुटबॉलर डायबाला आणि त्याची गर्लफ्रेंड ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

तुरिन : वृत्तसंस्था – इटालियन फुटबॉल क्लब जुव्हेंटसचा स्टार फुटबॉलर पाउलो डायबाला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. अर्जेन्टिनाचा फॉरवर्ड डायबाला जुव्हेंटस क्लबचा तिसरा खेळाडू आहे जो कोरोना व्हायरसने बाधित झाला आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनाचा सर्वाधिक त्रास इटली मध्ये होत आहे. शनिवारी, इटलीमध्ये कोरोनाचे 53578 रुग्ण आढळले आहेत आणि सुमारे 5000 लोक मरण पावले आहेत. डायबालाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की तो आणि त्याची गर्लफ्रेंड ओरियाना सेबेटिनीला ही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

सेबेटिनी एक अर्जेंटीनाची गायिका आणि मॉडेल आहे. डायबालाने ट्विटरवर लिहिले आहे, ‘सर्वांना नमस्कार, मी तुम्हाला फक्त इतकेच सांगू इच्छितो की मी आणि ओरियाना कोविड 19 च्या टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलो आहोत. सुदैवाने आमची प्रकृती ठीक आहे. तुमच्या संदेशाबद्दल धन्यवाद. ‘

दरम्यान, जुव्हेंटस क्लबने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 11 मार्चपासून डायबाला स्वतःला घरी वेगळे ठेवत आहे. इटलीमधील सर्व फुटबॉल उपक्रम 13 एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.