बबिता फोगाटला टेरेरिस्ट म्हणणार्‍यावर भडकली ज्वाला गुट्टा, म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाइन : देशात कोरोना संसर्गाचा प्रसार करण्यास तबलिगी जमात कारणीभूत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भारताची कुस्तीपटू बबिता फोगटने केले होते. त्या वक्तव्यानंतर तिच्यावर बरीच टीका झाली होती. तर अनेक जण तिच्या समर्थानात देखील उतरले होते. दरम्यान, आता या मुद्द्यावर भारताची स्टार बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टानं तिचं मत ट्विट करत व्यक्त केलं आहे. तिनं या मतात बबिताच्या नावाचा उल्लेख केला नव्हता, परंतु एका फॉलोअर्सनं तिच्या ट्विटवर रिप्लाय देताना बबिताला “terrorist’ असं संबोधले असता त्यावर मात्र ज्वाला भडकली.

स्टार बॅटमिंटनपटू ज्वालाने ट्विट करत म्हटले होते की, “मला ट्रोल करण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की मी एक भारतीय आहे. भारतीय म्हणून मी पदक जिंकली असून तेव्हा माझी जात-धर्म कोणी पाहिलं नाही. माझ्या पदकाचं सेलिब्रेशन प्रत्येक भारतीयांनी केलं. कृपया आपल्या महान देशाचं असं विभाजन करू नका, एकजुटीने राहा.”

ज्वालाच्या या ट्विटवर एका फॉलोअर्सने तिला रिप्लाय दिला. “तुम्ही देशासाठी पदक जिंकत होता आणि काही लोकांना हेही माहिती नाही की देश काय आहे.” त्यात त्यानं या रिप्लाय ला #babita_fogat_terrorist हा हॅशटॅग वापरला होता.

त्यावरती ज्वाला गुट्टा यांनी उत्तर दिलं की, तुम्ही वापरलेला हॅशटॅग मला आवडलेला नाही, कृपा करून तो डिलीट करा.

त्याचवेळी, ज्वालानं बबिताला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्याची विनंती केली. ” माफ कर बबिता हा व्हायरस कोणताही जात-धर्म पाहत नाही. तुला मी विनंती करते की तुझं ट्विट डिलीट कर. आपण खेळाडू आहोत आणि आपण धर्मनिरपेक्ष देशाचं प्रतिनिधित्व करतो.” असं ज्वाला म्हणाली.