तांड्यावरच्या ज्योतीनं फडकवला अटकेपार ‘झेंडा’, मारली आंतरराष्ट्रीय बेसबॉलमध्ये ‘धडक’

लातूर : पोलिसनामा ऑनलाईन – लातूरच्या ज्योती पवारने जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारताच्या बेसबॉल संघात आपले स्थान मिळवून पराक्रम केला आहे. चीन येथे होणाऱ्या महिलांच्या दुसऱ्या एशियन चॅम्पियनशीपसाठी तिची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रहिवासी असलेली ज्योती पवार हिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची. मात्र ज्योतीने या क्रीडाप्रकारात नाव उंचावल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बेसबॉलसह सॉफ्टबॉलमध्येही पारंगत –

बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेणारी ज्योती हि बेसबॉल बरोबरच सॉफ्टबॉलमध्येही पारंगत आहे. तिला लहानपणापासूनच बेसबॉल खेळण्याची आवड होती. तिने शालेय स्तरावर देखील या क्रीडाप्रकारात अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. राज्यस्तरावर तिने आपल्या संघाला दोन वेळा सुवर्ण तर दोनवेळा रौप्य पदक मिळवून दिले आहे. त्यानंतर झालेल्या निवड चाचणीत तिची भारतीय संघात निवड करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेची हुकली होती संधी…

मागील वेळी देखील तिची निवड चाचणीमध्ये निवड झाली होती. मात्र महिलांच्या स्पर्धा न झाल्याने तिला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र तिने आपल्या मेहनतीच्या बळावर पुन्हा प्रयत्न करत राष्ट्रीय संघात निवड केली. 10 राज्यस्तरीय स्पर्धांपैकी तिने 9 स्पर्धांमध्ये आपली उत्तम कामगिरी केली आहे. यासाठी तिला बेस्ट पिचर अ‍ॅवॉर्डने सन्मानित देखील करण्यात आले आहे. यासाठी तिला अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन देखील लाभले.

भारतीय संघात निवडीची जिद्द –

राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याने आपली राष्ट्रीय स्तरावर नक्की निवड होणार याची जिद्द तिच्या मनात असल्याने तिने प्रयत्न करून शेवटी राष्ट्रीय संघात स्थान मिळवलेच. यासाठी तिला अनेक जणांनी सहकार्य केले.

Visit : Policenama.com