पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात कोल्हापूरचे ज्योतिबा चौघुले शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात ज्योतिबा चौघुले शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहीद चौघुले हे कोल्हापूर जिल्ह्यातील महागाव येथील रहिवासी होते. काश्मीरच्या गुजर सेक्टरमध्ये पाक सैन्यासोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले असून हेलिकॉप्टरमधून त्यांचा मृतदेह श्रीनगर येथे आणण्यात आला आहे. शहीद ज्योतिबा चौघुले हे ६ मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. ज्योतिबा चौघुले हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील राहणारे आहेत. ते सैन्यदलात २००९ साली दाखल झाले होते. उद्या दुपारी महागाव येथे त्यांचा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. या अचानक झालेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानने या अगोदर देखील युद्धबंदीचे उल्लंघन केले होते.

पाकिस्तानकडून उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुजर सेक्टर येथील निवासी भागात लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. दुपार उलटल्यावर पुन्हा नियंत्रण रेषेला लागून आसलेल्या बखतूर भागात पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गेल्या तीन दिवसांपूर्वी उरी सेक्टरमध्ये पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानकडून वेळोवेळी उल्लंघन करण्यात आल्याने आता भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारास प्रत्युत्तर देणे सुरू आहे. या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थ आपला जीव मुठीत धरून घरात लपून बसलेले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/