4000 कोटी, 146 वर्ष जुना, असा आहे ज्योतिरादित्य शिंदेंचा ‘राजवाडा’

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – ग्वाल्हेर राजघराण्याशी संबंध असलेले ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाल्याने सध्या चर्चेत आहेत. ज्योतिरादित्य एक आक्रमक नेते तसेच राजघराण्याचे वारस म्हणून ओळखले जातात. ज्योतिरादित्य शिंदे ज्या महालात राहतात, तो 12 लाख स्क्वेअर फुटापेक्षा मोठा आहे. ते या महालाचे एकमेव वारस आहेत. ज्योतिरादित्य यांचे कुटुंब ज्या महालात राहते त्या महालाची खासियत काय आहे, ते जाणून घेवूयात.

हा महाल महाराज जयाजीराव सिंधिया अलीजाह बहादुर यांनी 1874 मध्ये बांधला होता. त्यावेळी यासाठी 1 करोड रुपये खर्च करण्यात आले होते. आज या सुंदर शाही महालाची किंमत वाढून 4000 करोडवर पोहचली आहे. या महालाचे डिझाईन आर्किटेक्ट सर मायकल फिलोस यांनी केले होते. त्यांनी वास्तुकलेतील इटालियन, टस्कन आणि कोरियन शैलीतून प्रेरणा घेऊन हा महाल बांधला होता. जयविलास महाल, ग्वाल्हेरमध्ये सिंधिया राजघराण्याचे सध्याचे राहण्याचे ठिकाणच नव्हे, तर एक भव्य संग्रहालयसुद्धा आहे.

महालत 400 पेक्षा जास्त खोल्या आहेत, ज्याचा अर्धा भाग संग्रहालयासाठी वापरण्यात येतो. एकुण 1,240,771 स्क्वेअर फूटात पसरलेल्या या महालाच्या प्रमुख भाग संरक्षित करण्यात आला आहे, जसा तो बनवण्यात आला आहे. या राजेशाही महालाची निर्मिती वेल्सचा राजकुमार, किंग एडवर्ड सहावा याच्या भव्य स्वागतासाठी करण्यात आली होती. जे सिंधिया घराण्याचे निवासस्थानही होते. नंतर 1964 मध्ये हा महाल जनतेसाठी खुला करण्यात आला.  भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे या महालाचे कायदेशीर मालक आहेत. या महालाची किंमत सुमारे 2 बिलियन अमेरिकन डॉलर असल्याचे सांगितले जाते. महालाची भव्यता पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येतात.

महालातील सिंधिया कुटुंबाच्या ड्रॉइंग रूममधल फर्नीचर अँटीक आहे. महालच्या सुमारे 35 खोल्यांमध्ये संग्रहालय तयार करण्यात आले आहे. जे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. महालातील 400 खोल्यांपैकी एक खास असलेली खोली ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव शिंदे यांची खोली आहे. आज सुद्धा त्यांच्या नावाने ही खोली संरक्षित आहे. या खोलीत माधवराव यांनी आपल्या पसंतीचे आर्किटेक्ट आणि अँटीक वस्तू ठेवल्या होत्या.

या संग्रहालयाचे खास आकर्षण आहे चांदीची रेल्वे, जिचे रूळ डायनिंग टेबलवर लावण्यात आले आहेत. अतिमहत्वाच्या लोकांसाठी भोजन कार्यक्रमात ही रेल्वे पेय देत पुढे जाते. या हॉलमध्ये इटली, फ्रान्स, चीन आणि अन्य देशातील अनेक दुर्मिळ कलाकृती आहेत. महालाचा प्रसिद्ध दरबार हॉल या महालाची भव्यता दर्शवतो. येथे लटकवण्यात आलेले दोन झुंबर दोन-दोन टनाचे आहेत, असे म्हटले जाते की, हे जेव्हा लटकवण्यात आले तेव्हा दहा हत्तींना छतावर चढवून मजबूती तपासण्यात आली होती.