ज्योतिरादित्यनंतर राहुल गांधी यांच्या मर्जीतील महाराष्ट्रातील ‘हा’ बडा नेता देखील भाजपच्या वाटेवर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला धक्का देत राजीनामा दिल्यानंतर आता त्यापाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे आणि तो देखील महाराष्ट्रात. गेल्या काही महिन्यापासून ज्योतिरादित्य शिंदे या कारणाने नाराज होते की त्यांना पक्षाकडून डावललं जातय. महाराष्ट्रात देखील काँग्रेस नेते मिलिंद देवरा गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे मिलिंद देवरा देखील राहुल गांधी यांच्या आतल्या वर्तुळातले मानले जातात. समवयस्क असल्याने त्यांचे नाते राजकारणापलीकडे आहे. राहुल यांच्या अनेक विदेश दौऱ्यांमध्ये मिलिंद देवरा त्यांंच्या सोबत असतात. परंतु आता संदर्भ बदलल्याने काँग्रेसला आणखी काही हादरे बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राहुल गांधींनी लोकसभा निवडणूकीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारली. त्यानंतर पक्षात तरुण आणि ज्येष्ठ नेते असा संघर्ष पेटला. ज्या नेत्यामुळे पक्षाची ही अवस्था झाली आहे त्यांनी आपली पद सोडली पाहिजे असे राहुल गांधीना वाटत होते.

मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान मोदींचे कौतूक केले होते. त्यांच्या एका ट्विटला पंतप्रधान मोदींनी उत्तर देखील दिले होते. त्यानंतर मिलिंद देवरा भाजपची वाट धरणार अशी चर्चा सुरु झाली.

मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार संकटात आहे. ज्योतिरादित्यांसह 20 आमदारांनी देखील राजीनामा दिला. त्यामुळे सरकार अल्पमतात आले. हे सर्व बंगळुरात असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे पक्ष प्रभारी खासदार विनय सहस्त्रबुद्धे हे तातडीने भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. कमलनाथ आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात कमळ फुलणार असे संकेत मिळत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून ज्योतिरादित्य शिंदे पक्षावर नाराज होते, अखेर त्यांना सोनिया गांधींकडे आपला राजीनामा सोपावला. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशात भाजपला आणखी काही राजकीय हादरे बसण्याची शक्यता आहे.