ज्योतिरादित्य भोपाळमध्ये गरजले, शिंदे कुटुंबाला डिवचून काँग्रेसने मोठी चूक केली

भोपाळ : वृत्तसंस्था – काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचे आज संध्याकाळी भोपाळमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच काँग्रेसला आव्हान दिले. शिंदे कुटुंबीयांना डिवचून काँग्रेसने मोठी चूक केली आहे, असा इशाराच ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला.

ज्योतिरादित्य म्हणाले, जे योग्य आहे ते शिंदे कुटुंबाचा प्रमुख नेहमी बोलत आला आहे. 1967 मध्ये शिंदे कुटुंबाच्या प्रमुख असलेल्या माझ्या आजीला डिवसले गेले होते. तेव्हा काय झाले हे सर्वांना माहित आहे. पुढे 1990 मध्ये माझ्या वडिलांवर हवाला कांडाचा खोटा आरोप केला गेला. तेव्हा काय झाले ? आणि आज मी अतिथी विद्वान आणि शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. जाहिरनाम्यात जे आहे त्याची पूर्तता झाली नाही, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असे मी म्हटले होते. शिंदे कुटुंब कायम सत्याच्या मार्गावर चालत आले आहे. शिंदे कुटुंबाला जेव्हा डिवचले जाते तेव्हा हे कुटुंब जगाशी लढण्याची हिंमत बाळगते.

माझ्यासाठी आजचा दिवस भावनिक दिवस आहे. जी संघटना आणि ज्या कुटुंबात मी माझी वीस वर्षे घालवली, माझी मेहनत, संकल्प ज्यांच्यासाठी खर्च केले. त्या सर्वांना सोडून मी आज तुमच्या हवाली होत आहे. अटल बिहारी वाजपेयी असतील, नरेंद्र मोदी असतील, राजमाता असतील किंवा शिंदे कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी असेन, आमच्यासाठी जनसेवा हाच प्रधान्यक्रम राहिला आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपची दारं माझ्यासाठी उघडली गेली हे माझं भाग्य आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे आशीर्वाद लाभले आहेत. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तुम्ही सगळे एक आहेत, आम्ही तुमच्यात एक म्हणून आलो आहोत. आता 1 आणि 1 दोन नाही तर 11 झाले पाहिजेत असे ज्योतिरादित्य यांनी म्हटले आहे.