ज्योतिरादित्यांच्या भाजप प्रवेशावर आत्या यशोधराराजे म्हणाल्या – ‘ही तर त्यांची घरवापसी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर मध्यप्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का लागला. 18 ते 20 आमदार फोडल्याने मध्यप्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ यांचे सरकार अडचणीत आले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजकीय निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रक्रिया यायला लागल्या आहेत.

दरम्यान भाजपच्या नेत्या असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आत्या यशोधराराजे सिंधिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणले की ही ज्योतिरादित्य सिंधिया यांची घरवापसीच आहे.

यशोधरा राजे सिंधिया म्हणाल्या, ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मला आनंद झाला आहे. मी त्यांचे अभिनंदन करते. ही त्यांच्यासाठी घरवापसीच आहे. कारण माधवराव शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात पण जनसंघापासूनच झाली होती. गेल्या काही काळापासून ज्योतिरादित्य सिंधिया यांना काँग्रेसकडून दुर्लक्षित करण्यात येत होते.

या दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार याची चर्चा रंगली होती त्यानंतर ते पंतप्रधानांना भेटण्यासाठी अमित शाह यांच्या गाडीने गेले आणि पुन्हा परत आले. यानंतर त्यांनी सोनिया गांधीला लिहिलेला राजीनामा समोर आला ज्यावर 9 मार्च 2020 ही तारीख होती.

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवी सुरुवात करायची आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे सोपावला. भाजपने आज संध्याकाळी सीईसीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ज्योतिरादित्य सिंधिया सहभागी होण्याची शक्यता आहेे.