ज्योतिरादित्यांच्या भाजप प्रवेशावर भावाची हरकत, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसमध्ये अन्याय झाला म्हणून जोतिरादित्य शिंदेनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जोतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशावर त्यांचे बंधू आणि त्रिपुरा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माणिक्य शाही कुटुंबाचे सदस्य प्रद्योत देववर्मन यांनी आक्षेप घेतला आहे. जोतिरादित्य यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले व काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना योग्य प्रमाणात संधी मिळत असल्याचेही यावेळी देववर्मन यांनी सांगितले. देववर्मन यांनी गेल्या वर्षी त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस सुद्धा आपल्या पक्षातील युवा नेत्यांना समोर आणण्यास तयार आहे. देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची गरज असल्याचे देववर्मन यांनी सांगितले. राजस्थानच्या सचिन पायलट आणि झारखंडचे अजय कुमार यांच्यात काम करण्याची प्रचंड क्षमता आहे. माजी आयपीएस अधिकारी व झारखंड काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार यांनी मागच्या वर्षी काँग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. भाजपविरुद्ध लढण्यास काँग्रेस तयार नसेल तर, स्वतंत्र पक्ष स्थापन करून त्याद्वारे सर्वांनी काम करायला हवे असे, देववर्मन यांनी सुचविले.

राहुल गांधींना आपल्याला भेटण्यासाठी वेळ दिला नाही अशी खंत जोतिरादित्य शिंदे व्यक्त केली, त्यावर आपल्याला भेटण्यासाठी ज्योतिरादित्य यांना वेळ मागण्याची गरज नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. राहुल गांधींनी याबाबत एकदा आपल्या कार्यलयात चौकशी करावी असे देववर्मन यांनी सांगितले.