कडकनाथ कोंबडी घोटाळा : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलासह तिघांना बनवलं ‘साक्षीदार’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांना साक्षीदार बनवण्यात आले आहे. या घोटाळ्याविषयी सचिन काशिनाथ शिर्के यांनी पाटण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.

कडकनाथ कोंबडी पालन’ व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे आले असून कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यात सुधीर मोहिते, संदिप मोहिते, गणेश शेवाळे, वसीम इबुसे, दमाने मॅडम, सागर खोत यांची आरोपी म्हणून नावे असल्याची प्राथमिक माहिती होती. पण, सातारा पोलिसांनी याप्रकरणी सागर खोत, वसीम इबुसे, दमाने मॅडम यांना साक्षीदार केले आहे. तसेच याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याचे म्हटले आहे.

कडकनाथ कोंबडी पालनातुन ‘एकमेका सहायक करू अवघेची होऊ श्रीमंत’ हे घोषवाक्य घेऊन सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महारयत अ‍ॅग्रो कंपनी आणि या कंपनीच्या सहा उपकंपन्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी कडकनाथ ग्रस्त शेतकऱ्यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याचे निवदेन दिले होते. तेजस्वी सातपुते यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारून पाटण पोलिसांना सबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याच आदेश दिले होते.