पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती शाळा होणार ‘माॅडेल स्कूल’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) – पुरंदर तालुक्यातील एक मॉडेल स्कूल म्हणून कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेची शाळा निर्माण होऊ शकते. आपण स्वतः याबाबत शाळेला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे (तत्कालीन) मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी शाळा भेटीच्यावेळी दिले.

पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे, पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी रामदास वालझडे, गटसमन्वयक संजय चव्हाण, केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, सतीश कुदळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर, इंग्रजीलेखन, वाचन, शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक अनंता जाधव आणि सहशिक्षिका सुरेखा जाधव यांनी माहिती दिली.

विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सदस्य झुरंगे यांची दोन्ही मुले जिल्हा जाधव परिषदेच्या शाळेत शिकत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलेच, शिवाय येथील ग्रामस्थांचा शाळेबाबतचा असलेला सहभाग, ग्रामस्थांनी शाळेच्या इमारतीसाठी दिलेली ११ गुंठे जागा, शाळेला भौतिक सुविधांबाबत ग्रामस्थांचे होणारे सहकार्य आणि दोन वर्षांत १२ वरून ४८ पर्यन्त विद्यार्थ्यांची झालेली संख्या पाहता ही शाळा पुरंदरची एक मॉडेल स्कूल बनू शकते.

शाळेला हव्या असणाऱ्या सोयी सुविधांबाबतचे प्रस्ताव ताबडतोब जिल्हा परिषदेकडे पाठवावेत, अशा सूचनाही त्यांनी गटशिक्षणधिकारी वालझडे यांना केल्या आहेत. ग्रामस्थांनीही शाळेला जागा दिली आहे. जिल्हा परिषदेने अद्ययावत इमारत द्यावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषदेकडून शाळेला वर्गखोल्या व संरक्षक भिंत बांधन दिली जाईल. त्याचबरोबर वस्तीपर्यंतच्या रस्त्याचे कामही मार्गी लावू, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव आणि जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी सांगितले.

यावेळी शाळा दत्तक घेणारे ज्येष्ठ पत्रकार बी. एम. काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर कदम, ग्रामस्थ संपत गरुड, हनुमंत कदम, बबन कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक अनंता जाधव यांनी स्वागत केले. सहशिक्षिका सुरेखा जाधव यांनी आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा –