‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली…, अन् कुठे महाराष्ट्राचं वैभव… तर कुठे युपीचं..’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी संध्याकाळी (१ नोव्हेंबर) मुंबईत दाखल होताच अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. तसेच ते आज बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांशी आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. यावरून मनसेने योगी आदित्यनाथवर सडकून टीका केली आहे. “कहा राजा भोज…और कहा गंगू तेली,” अशा शब्दांत मनसेने योगींवर निशाणा साधला आहे.

मुंबईचं वैभव असलेलं बॉलिवूड योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशाला न्यायचं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेने होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. योगी आदित्यनाथ वास्तव्यास असलेल्या ट्रायडेंट हॉटेलबाहेर मनसेने बॅनरबाजी केली आहे.

“कहा राजा भोज…और कहा गंगू तेली..,’ कुठे महाराष्ट्राचे वैभव, तर कुठे युपीचे दारिद्र्य, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी नेण्याचे मुंगेरीलालचे स्वप्न. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळविण्यासाठी आलेला ‘ठग’,” असे होर्डिंग मनसेने लावला आहे.

कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाही

“महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत, तर अन्य राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत अयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.