कंजारभाट तरुणीची आत्महत्या, जिवंतपणी नाही तर मृत्यूनंतर मिळाली ‘जातगंगा’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आजोबांनी समाजात घेण्यास नकार दिल्याने एका कंजारभाट तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. तरुणीने आईसह आपल्याला समाजात घ्यावे अशी मागणी आजोबांकडे केली होती.
मात्र, त्यांनी त्याला नकार दिला होता.

मानसी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मानसीने तिच्या आजोबाकडे आईसह जातीत घेण्याची मागणी केली होती. आजोबांनी समाजात माझी इज्जत आहे. मी बाहेरच्या बाईला माझी जात देणार नाही असे सांगून त्यांनी सुनेसह मानसीचा छळ केला होता. आजोबा आणि कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीच्या नकार घंटेमुळे अखेर मानसीने तिच्या काकाच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

काय आहे प्रकरण ?
जळगाव शहरातील जाखनीनगर येथील कंजारभाट समाजाचे वरिष्ठ सरपंच दिनकर बागडे यांचा मोठा मुलगा आनंद याने 20 वर्षापूर्वी मृत मानसीच्या आईसोबत कोर्टात विवाह केला होता. आनंद यांना या महिलेपासून दोन मुली झाला त्यापैकी एक मानसी. मात्र आनंदच्या वडिलांनी जातीतील मुलीसोबत आनंदचे लग्न लावून दिले. तिच्यापासून त्याला तीन अपत्ये झाली.

मानसी बारावीत शिकत असताना तिने आजोबा दिनकर बागडे यांना आईसह आम्हाला जातीत घेण्याची विनंती केली. तसेच कंजारभाट समाजातील तरुणासोबत लग्न करण्याची तयारी तिने दाखवली होती. मात्र, दिनकर बागडे आणि जात पंचायत सदस्य सावन गागडे, दीपक माछरे, बिरुजू नेतले, मंगल गुमाने आणि संतोष गांरुगे यांनी मानसी आणि तिच्या आईला ‘जातगंगा’ देण्यास नकार दिला. अखेर मुलीचे काका विजय बागडे यांनी मानसीचे लग्न कोल्हापूर येथे निश्चित केले होते. लवकरच लग्नाची तारीख काढण्यात येणार होती. मात्र, जातपंचायत आणि आजोबांच्या नकार घंटेमुळे मानसीने आपले आयुष्य संपवले. विशेष म्हणजे आजोबा दिनकर बागडे याने अद्याप मानसीला पाहिले देखील नव्हते.

मृत्यूनंतर मिळाली ‘जातगंगा’
मानसीने आईसह आपल्याला ‘जातगंगा’ देऊन जातीत घेण्याची मागणी केली होती. मात्र, जिवंतपणी तिला जातगंगा देण्यास नकार दिला. अखेर मानसीने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले. तिच्या मृत्यूनंतर जातपंचायतीने मुलीच्या आईला तिच्या वडिलांकडून 20 हजार रुपये रोख देऊन मानसीवर कंजारभाट समाजाच्या परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करावेत असा निर्णय दिला. जिवंत असताना ‘जातगंगा’ मिळाली नाही मात्र मृत्यूनंतर मानसीला ‘जातगंगा’ मिळाली.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like