Coronavirus : कळंब पोलीस ठाण्यातील 15 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –   कळंब पोलीस ठाण्यातील तबल 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. आज रॅपिड टेस्ट केल्यानंतर लागण झाल्याचे निदान झाले असून, यामुळे जिल्ह्यासह कळंब तालुक्यात खळबळ उडाली आहे. यात 13 पुरुष व 2 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. आधीच कमी मनुष्यबळावर पोलीस काम करत असताना आता त्यात 15 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने ताण वाढणार आहे.

उस्मानाबाद जिल्हा पोलिस दल 24 तास काम करत असताना पोलिसांना देखील कोरोनाची लागण होत आहे. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पण थेट जनतेचा संपर्क येत असल्याने लागण होत आहे. कळंब पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण 80 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी आज 55 कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 15 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. उर्वरित काही कर्मचारी पोलीस मुख्यालयात आहेत. तर काही कर्मचारी रजेवर आहेत.

कळंब पोलीस ठाण्याअंतर्गत शहरासह 26 गावे येतात. त्यामुळे मोठी कसरत पोलिसांना करावी लागते. त्यात ऐन गणेशोत्सव काळात 15 कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावे लागेल.

—-चौकट—

अचानक कळंब पोलीस ठाण्यातील 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. काम करताना त्याचा ताण वाढणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अधिक कर्मचाऱ्यांची मागणी केली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
अशोक पवार, सहायक पोलीस निरीक्षक, कळंब पोलीस ठाणे