कळंबीत देशी दारूचा कंटेनर जप्त

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

कळंबी (ता. मिरज) येथे गोवा बनावटीची देशी दारू घेऊन जाणारा कंटेनर जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबईतील भरारी पथकाने गोव्यापासून पाठलाग करत कळंबीत ही कारवाई केली. याप्रकरणी कंटेनर चालक राजकुमार पी. पाण्डेयन के. (वय 35, रा. ठाणी, तामिळनाडू), जीमोन राफेल पी. आर. (वय 49, रा. त्रिचुरा, केरळ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 26 लाख रूपयांची देशी दारू, कंटेनर असा पन्नास लाखांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.
[amazon_link asins=’B074CNJ6HS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d5afa031-8396-11e8-a78c-791a6dd5a26d’]

गोव्यातून देशी दारू घेऊन एक कंटेनर मिरजेकडे येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यांनी मुंबईतील भरारी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शनिवारी रात्री देशी दारूच्या 90 मिलीच्या 100 बाटल्या असणारे एक हजार बॉक्स घेऊन कंटेनर (एमएच 06 एक्यू 0501) गोव्यातून निघाला होता. कंटेनर गोव्यातून निघाल्यापासून भरारी पथकातील अधिकारी, कर्मचारी त्याच्या मागावर होते.

रविवारी रात्री कंटेनर मिरज तालुक्यातील कळंबी येथे एका ढाब्यावर थांबला. बराच वेळ तो कंटेनर तेथेच थांबून होता. त्यानंतर पथकाने छापा टाकून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. नंतर कंटेनरची तपासणी केल्यानंतर मागील बाजूस नारळाने भरलेली पोती आढळून आली. पोती बाजूला केल्यानंतर आत देशी दारूच्या बाटल्यांनी भरलेले एक हजार बॉक्स आढळून आले. याबाबत दोघाही संशयितांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
[amazon_link asins=’B071L8JTL4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc9b2cb2-8396-11e8-902a-3fcb08c6857b’]

दोघांनाही सोमवारी मिरजेतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पथकाने दोघांचाही ताबा घेऊन त्यांना मुंबईला हलविले आहे. दरम्यान ही दारू गोव्यातून नेमकी कोठून आणली, कोठे नेणार होते याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे निरीक्षक दीपक परब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आयुक्त डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परब, प्रसाद सास्तूरकर, दिलीप काळेल, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.