म्हणून करण जोहरच्या ‘या’ चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली 

मुंबई : वृत्तसंस्था – करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा मल्टी स्टारर ‘कलंक’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. त्यातून चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका समोर आल्या. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र फिल्ममेकर्सने या चित्रपटाच्या तारखेत बदल केला आहे. या निर्णयानुसार ‘कलंक’ आता दोन दिवस आधीच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘कलंक’ १९ नाही तर १७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाची तारीख बदलण्यामागे एक खास कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. १७ एप्रिल रोजी महावीर जयंती असल्यामुळे अनेकांना सुट्टी असते. विशेष म्हणजे याच आठवड्यात गुड फ्रायडेदेखील आहे. एकाच आठवड्यात दोन सुट्ट्या आल्यामुळे याचा चित्रपटाला फायदा होऊ शकतो त्यामुळे फिल्ममेकर्सने या तारखांमध्ये बदल केला आहे. एकाच आठवड्यात असलेल्या या दोन सुट्ट्यांचा या चित्रपटाच्या कमाईला फायदा होईल असा विचार करूनच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली आहे.

१२ मार्चला या चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरून धवन, आलिया भट, आदित्य कपूर, कियारा अडवाणी अशी तगडी स्टार कास्ट झळकणार आहे. चित्रपटाचा काळ ४० च्या दशकातला दाखवण्यात येणार असून अभिषेक बर्मन यांनी याचित्रपटाचे डायरेक्शन केले आहे.