Aurangabad News : औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वातावरण ‘तापलं’, काँग्रेस म्हणतेय प्रस्ताव ‘दुय्यम’ तर मनेसेचे ‘संयम’

मुंबई / औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नामांतराला काँग्रेसन विरोध दर्शवल्यानंतर भाजपने शिवसेनेला डिवचलं होत. त्यावर शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत (sanjay raut)  यांनी औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर काँग्रेस नेत्यांचे अधिक प्रेम आणि श्रद्धा असणार, याची मला खात्री आहे, असे सांगून भाजपचे कान टोचले आहे. दुसरीकडे सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्पष्ट केले. तर २६ जानेवारीपूर्वी हे नामांतर केले नाही, तर आंदोलन करणार असल्याची भूमिका मनसेने घेतली. एकूणच औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भाजपला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भाजपचे गेली पाच वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल उपस्थित करत संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. केंद्रात भाजपची सत्ता असूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तर मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की केवळ अग्रलेख लिहून काही होणार नाही, राज्यात तुमचे सरकार आहे. आता औरंगाबादचे संभाजीनगर करून दाखवा. आम्ही २६ जानेवारीपर्यंत वाट पाहू. नाहीतर, आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नामांतराचा प्रस्ताव दुय्यम : अशोक चव्हाण
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्याबाबत सरकारकडे कुठलाच प्रस्ताव नाही. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम आहे. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह हे राहणारच; परंतु सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसार हे सरकार चालविले जात आहे, असे सांगून सर्व आलबेल असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले.

अहमदनगरचेही नाव ‘अंबिकानगर’ करा
औरंगाबाद, नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून वाद सुरु असतानाच अहमदनगरचे नावही ‘अंबिकानगर’ करावे, अशी मागणी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे.औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये जोरदार आंदोलन केले.