मंदिरांनंतर आता रामलीलावरून भाजपचे राजकारण, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र, शिवसेनेनं दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे राज्यात बंद असलेली मंदिरे पुन्हा खुली करावीत या मागणीसाठी भाजपाने शिवसेनेला हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. या मागणीसाठी भाजपाच्यावतीने काही ठिकाणी निदर्शने देखील करण्यात आली. दरम्यान, आता भाजपाने रामलीला आयोजनाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला आपल्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून प्रत्युत्तर दिले होते. यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपाने राज्यात अनेक ठिकाणी मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. आता भाजपाने रामलीलासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

रामलीला आयोजनाची मागणी भाजपा आमदार अतूल भातखळकर यांनी सुद्धा केली आहे. त्यांनी म्हटले की, राज्यात रामलीलेची मोठी परंपरा आहे. कोरोना काळात रामलीला अतिशय सहज आयोजित केली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नाही. मग आता किमान रामलीला आयोजनास तरी परवानगी द्यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी किमान बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व लक्षात ठेवावे. बाळासाहेब आज असते, तर त्यांनी सर्वप्रथम मंदिरं खुली केली असती आणि त्यानंतर बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल उघडली असती.

भाजपाने केलेल्या या मागणीला आणि शिवसेनेवर केलेल्या टिकेला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उत्तर देताना म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून काही जण रामाच्या नावाने राजकारण करत आहेत. आजही हे लोक मते मागण्यासाठी तेच करत आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आहे. मात्र तरीही अशा मागण्या केल्या जात आहेत. कोरोना संकट संपताच मुख्यमंत्री स्वत: सगळी धार्मिकस्थळं सुरू करतील.