मटका किंगचा त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून खून

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण स्टेशन परिसरात नीलम गल्लीत मटका किंग उर्फ मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी जिग्नेशला फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी जिग्नेशला मृत घोषीत करण्यात आले.

जिग्नेश ठक्कर याचा खून करणारे आरोपी धर्मेश उर्फ नन्नू नितीन शाह व जयपाल उर्फ जापान यांच्यासह दोन जणांनी केला आहे. हे चारही आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. तपास कामाकरीता पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. जिग्नेश ठक्कर याचे कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे परिसरात मटका आणि रमी क्लब असून तो क्रिकेट सामन्यावरही सट्टाबाजार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

चार दिवसांपूर्वी आरोपी धर्मेश नितीन शहा याचा मित्र चेतन पटेल व जिग्नेश ठक्कर यांच्यामध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली होती. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात चेतन पाटेल याने जिग्नेश ठक्कर, सऊद शेख, मनीष चव्हाण यांच्या विरोधात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती. तर जिग्नेश ठक्कर याने चेतन पटेल याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. यावरून धर्मेश याच्या मनात जिग्नेशबद्दल राग होता. या दोघांमध्ये पूर्वी आर्थिक कारणावरून वाद झाल होते. याच वादातून मटका किंग जिग्नेशच्या छातीवर चार गोळ्या झाडून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.