कल्याणमध्ये हॉस्पिटलने बिलासाठी अडवलं, नगरसेवकानं आजींना ‘डायरेक्ट’ उचलून आणलं !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनावर मात केलेल्या एका आजीबाईंना हॉस्पिटलने बिलासाठी थांबवून ठेवल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला. यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकाने थेट पीपीई किट घालत हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला आणि या आजीबाईंना उचलून बाहेर आणले आहे.

कल्याण पूर्वेत राहणार्‍या या आजीबाईंना कोविड-19 झाल्याने त्या 14 दिवसांपूर्वी कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. दाखल होताना त्यांना 70 ते 80 हजार रुपये बिल होईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी 80 हजार रुपये भरलेही. मात्र डिस्चार्ज देताना त्यांना पीपीई किटचे 49 हजार आणि कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे अतिरिक्त पैसे असे वाढीव 70 ते 80 हजार रुपये मागण्यात आले. हे पैसे दिल्याशिवाय डिस्चार्ज देता येणार नसल्याचे सांगत त्यांची अडवणूक करण्यात आली.

ही बाब त्यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेचे कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड यांना सांगितली. गायकवाड यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉस्पिटलने हुज्जत घातल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर संतापलेल्या गायकवाड यांनी थेट पीपीई किट अंगावर चढवला आणि चौथ्या मजल्यावर दाखल असलेल्या या आजीबाईंना थेट उचलून हॉस्पिटलबाहेर आणले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.