Kalyan News : तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू अन्य दोघे जखमी

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – हळदी समारंभ सुरु असल्याचा फायदा घेत घरात घुसून तिघांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात रविवारी (दि. 21) मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान, हा प्रकार लुटमारीतून झाला की अन्य काही कारणातून याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सुवर्णा चिंतामण घोडे असे हल्ल्यात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे दोघेजण जखमी झाले आहेत. दोघांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्लेखोर कोण होते, याचा शोध सुरु असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.