कल्याण : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या अभिनंदनाच्या बॅनरवर शिवसेनेचे दिग्गज नगरसेवक झळकले

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी कल्याण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज काहीना काही राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. कल्याण पूर्वेला नेतीवली चौकात काँग्रेसचा एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर शिवसेनेचे मातब्बर दोन नगरसेवकांचे फोटो झळकले आहे. यामुळे कल्याणमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसच्या या बॅनरवर शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि नविन गवळी यांचे फोटो झळकत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बॅनरवर नेमकं काय आहे ?

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बॅनर नेतीवली चौकात लावण्यात आला आहे. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच कल्याणमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी येत आहेत. या कार्यक्रमानिमित्ताने त्यांचे कल्याण नगरीत स्वागत आहे, असा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी व नविन गवळी यांचे फोटो आहेत.

मल्लेश शेट्टींनी लावला होता वादग्रस्त बॅनर

शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी मागील आठवड्यात नेतीवली नाक्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावला होता. या बॅनरमध्ये खासदार शिंदे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना टोमणे मारण्यात आले होते. ‘खासदार दिलदार है, मगर चमचो से लोक परेशान है’, असा मजकूर त्या बॅनरवर छापण्यात आला होता. यामुळे शिवसेनेतील कल्याणमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. या वादग्रस्त बॅनरचे वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर हा बॅनर हटवण्यात आला होता. त्यानंतर त्याठिकाणी शुभेच्छा देणारा दुसरा बॅनर लावण्यात आला.