‘भाजप’पासून सावध रहा ; मुख्यमंत्री कमलनाथांचा काॅंग्रेस आमदारांना ‘सल्ला’

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मध्यप्रदेशमध्ये सत्ता असूनही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. यापार्श्वभूमीवर राज्यातील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी भाजपने राजकीय डावपेच आखणे सुरू केले आहेत. त्यामुळे कमलनाथ यांनी काँग्रेस आमदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एकजूट दाखवा, आपल्यात फूट पडू देऊ नका, भाजपचे षडयंत्र उधळून लावा, असं कमलनाथ यांनी म्हंटले आहे.

कमलनाथ यांनी म्हंटले आहे की, कामाचा अतिरिक्त ताण असल्यानेच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अनेक नेत्यांच्या पूत्रप्रेमामुळेच पराभवाला सामोरं जावं लागल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीतील पराभवाला सामोरे गेल्यानंतर कमलनाथ यांनी मंत्र्यांसोबत दीड तासाची बैठक घेतली. त्यात निवडणुकीतील पराभव आणि आगामी काळातील रणनीतीवरही चर्चा करण्यात आली. मध्यप्रदेश विधानसभेतील काँग्रेसची सदस्य संख्या ११४ असून भाजपची सदस्य संख्या १०९ आहे. केवळ ७ जागाच काँग्रेसकडे अधिक असल्याने काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपनं डावपेच आखणे सुरू केले आहे. त्यामुळे कमलनाथ सावध झाले असून त्यांनी काँग्रेस आमदारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.