‘या’ मंत्र्याची जीभ घसरली, दिव्यांगांना म्हंटले ‘लंगडे-लुळे’ आणि ‘आंधळे’

भोपाळ : वृत्तसंस्था – येथील काँग्रेस सरकारमधील मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. या मंत्र्याने दिव्यांगांबद्दल जे म्हटले त्यावरून ते ट्रोल होत आहेत. तसेच, दिव्यांगांनीही मंत्र्याने माफी मागावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.

15 वर्षानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारचे मंत्री आपल्या जीभेवर नियंत्रण ठेऊ शकत नसल्याचे दिसत आहे. हे प्रकरण मंदसौरमधील असून येथे कमलनाथ सरकारचे जलसंधारण मंत्री हुकुम सिंह कराडा हे शेतकरी कर्जमाफी सोहळ्यात बोलत असताना त्यांची जीभ घसरली.

त्यांनी दिव्यांगांना लंगडे-लुळे आणि आंधळे म्हटले. त्यांनी सरकारची कामे सांगाताना म्हटले की, आंधळे, लंगडे आणि लुळे यांच्यासाठी पेन्शन 300 वरून एक हजार रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम कमी आहे का.

जल संधारण मंत्री हुकुम सिंह कराडा मंदसौर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. ते सीतामऊ येथे आयोजित शेतकरी समेलनात बोलत होते.

मंत्र्यांची मुजोरी आणखी पुढेही दिसून आली. जेव्हा शेतकरी सत्यनारायण यांनी नामांतरण होत नसल्याची समस्या व्यक्त केली तेव्हा मंत्र्याने या शेतकर्‍याला गप्प बसण्यास सांगितले. भाषण संपल्यानंतर मंत्री त्या शेतकर्‍यावर संतापले. शेतकर्‍याला म्हणाले, तु तोच आहेस ना जो भाषणादरम्यान बोलत होता. जर हा प्रकार माझ्या मतदारसंघात केला असता तर तिथेच जोड्याने मारले असते. यादरम्यान कुणीतरी मंत्र्याचा व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपाने केला हल्ला
मंत्र्याच्या वक्तव्यावर भाजपा आमदार यशपाल सिंह सिसोदिया यांनी ट्विट करून म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना दिव्यांग नाव देऊन त्यांचा सन्मान केला आहे. मंदसौर जिल्ह्याचे पालकमंत्री दिव्यांगाना लंगडे, लुळे आणि आंधळे संबोधून कोणता संदेश देऊ पहात आहेत.

मंदसौरच्या दिव्यांगांनी केले आंदोलन
मंत्र्याच्या या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील दिव्यांगांनी एकत्र येत त्यांच्याविरूद्ध आंदोलन केले. बराच वेळ त्यांनी मंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनतर मोठ्या प्रयत्नाने त्यांना शांत करण्यात आले.