… म्हणून कमला मिल्सचे मालक दोषमुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कमला मिलमध्ये लागलेल्या आगीसाठी जबाबदार ठरलेल्या ‘वन अबव्ह’ (One above) आणि ‘मोजो बिस्त्रो’ (Mojo Bistro) या पबच्या मालकांच्या कृत्यासाठी गिरणीच्या मालकांना दोषी ठरवता येणार (kamla-mills-owner-flawless-akp) नाही, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांना प्रकरणातून दोषमुक्त करताना नोंदवले आहे. अन्य आरोपींविरोधात मात्र सकृतदर्शनी पुरावे दिसून येत असल्याने त्यांच्यावर खटला चालविण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

गोवानी आणि भंडारी तसेच ‘वन अबव्ह’चे मालक कृपेश आणि जिगर सिंघवी, तर ‘मोजो ब्रिस्त्रोचे मालक युग तुली यांच्यासह अन्य आरोपींनीही प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यातील केवळ गोवानी आणि भंडारी यांना न्यायालयाने त्यांच्यावरील सगळ्या आरोपांतून दोषमुक्त केले. त्यांना दोषमुक्त का केले, याबाबतच्या कारणमीमांसा करणाऱ्या आदेशात न्यायालयाने गोवानी आणि भंडारी यांनी केवळ ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्त्रो’ या पबच्या मालकांना जागा दिली होती. त्यामुळे दोन्ही पबचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रणेबाबत केलेल्या अनियमिततेशी गोवानी आणि भंडारी जबाबदार नाहीत, नसल्याचे म्हटले आहे.

गोवानी आणि भंडारी यांचा पबमध्ये चालणाऱ्या व्यावसायिक घडामोडींशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. शिवाय पबमधील अग्निशमन यंत्रणेबाबत आवश्यक ती परवानगी घेतली होती, असा दावा पबच्या मालकांचा आहे. परंतु जागेच्या मालकांनी प्रत्येक कागदपत्रे तपासून पाहणे अनिवार्य नाही. या सगळ्या बाबी लक्षात घेता गोवानी आणि भंडारी यांना त्यांच्यावरील सगळ्या आरोपांतून दोषमुक्त करण्यात येत आहे, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी स्पष्ट केले. तर दोन्ही पबच्या मालकांना पबमधील बेकायदा बांधकामांच्या परिणामांची पूर्णपणे माहिती होती, असे न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळताना नमूद केले आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
अग्निशामक दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील आणि संदीप शिंदे यांनाही दोषमुक्त करण्यास नकार देताना पाटील यांनी तर सुट्टीवर असतानाच्या तारखेची आणि पबना भेट न देताच पाहणीची बनावट कागदपत्रे तयार केली. शिंदे यांनीही कागदपत्रे खोटी असल्याचे माहीत असून ती मंजूर केली. या दोघांनी पबमधील बेकायदा बांधकामाबाबत मालकांवर कारवाई करण्याऐवजी ते लपवले. ‘वन अबव्ह’चे व्यवस्थापक या नात्याने लिस्बन लोपेज आणि केविन बावा यांची ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी घेण्याची जबाबदारी होती. पबमध्ये मालकांकडून केल्या जाणाऱ्या अनियमिततेचीही त्यांना जाणीव होती. घटना घडली त्या वेळीही ते ग्राहकांना मदत करण्याऐवजी पळून गेले. पालिका अभियंता नीलेश महाले यांनीही पबमधील बेकायदा बांधकामाकडे काणाडोळा केला, असे न्यायालयाने त्यांना दिलासा नाकारताना नमूद केले.